’एनडीए’च्या १४८ व्या तुकडीची पासिंग परेड ठरणार ऐतिहासिक   

पुणे : देशाला अनेक लष्करी अधिकारी, लष्करप्रमुख दिलेल्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) ३० मे रोजी होणारे दीक्षान्त संचलन (पासिंग आउट परेड) ऐतिहासिक ठरणार आहे. 
 
यावेळी १४८ व्या तुकडीचे संचलन केले जाणार आहे. एनडीएतील महिला छात्रांची पहिली तुकडी यंदा उत्तीर्ण होणार आहे. माजी लष्करप्रमुख आणि मिझोरामचे राज्यपाल जनरल (नि.) व्ही. के. सिंग यांच्याकडून संचलनाची पाहणी करण्यात येणार आहे. एनडीए आणि नौदल अकादमीमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नसल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल अर्जावर निर्णय देताना २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीएमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. 
 
त्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) प्रवेश प्रक्रिया राबवून जून २०२२ मध्ये प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरलेल्या महिला छात्रांना एनडीएमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला छात्रांची पहिली तुकडी आता उत्तीर्ण होण्यासाठी सज्ज झाली आहे.संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएचा पदवी प्रदान सोहळा २९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. गोरखपूरच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पूनम पांडे यांच्या हस्ते छात्रांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, त्या छात्रांना मार्गदर्शनही करणार आहेत. 
 
जनरल (नि.) व्ही. के. सिंग दीक्षान्त संचलनाला ‘पासिंग आउट परेड’ला उपस्थित राहणार आहेत. तसेच, त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या छात्रांना पदक प्रदान केले जाणार आहे. व्ही. के. सिंग हे एनडीएच्या ३६ व्या तुकडीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी २६ वे लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी निभावली होती. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रालयांचे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते मिझोरामचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

Related Articles